वसई (पालघर) - वसईतील वसंत नगरी परिसरात गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येऊ लागले आहे. या पाण्याच्या दुर्गंधीने आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई पूर्वेकडील भागात वसंत नगरी परिसर आहे. या भागात ५३ इमारती आहेत. या इमारतींमधील सांडपाणी जाण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर रस्त्यावर वाहात आहे.
नाल्यातील सांडपाणी इमारतीच्या आवारात आणि रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, हे घाणीचे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे पाण्याच्या भूमिगत टाक्याही प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
"मागील काही महिन्यांपासून आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. पालिकेने गटाराची स्वच्छता करावी आणि सांडपाणी जाण्याचे मार्ग रुंद करावेत", अशी मागणी येथील रहिवासी निर्मेश राज यांनी केली आहे.
वसंतनगरी येथे उभारण्यात आलेल्या गृह संकुलात सांडपाणी प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प सहा ते सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न होताच हे सर्व पाणी थेट नाल्यात सोडले जाते. त्याचाही मनस्ताप येथील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
ज्या ठिकाणी सांडपाणी बाहेर पडत होते. त्याठिकाणी सक्शन पंप लावून गाळ उपसा केला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच बंद असलेला सांडपाणी प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भात संबंधितांची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या जातील.
- व्यंकटेश दुर्वास, सहआयुक्त (प्रभाग समिती डी)