पालघर - तालुक्यातील खारेकुरण गावात एका विवाहित महिलेची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरती मनीष पाटील, वय ३३ वर्ष (माहेरचे नाव आरती चिंतामण अधिकारी) असे या हत्त्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शुक्रवारपासून बेपत्ता होती.
शेतात आढळला मृतदेह -
नागझरी येथील आरती चिंतामण अधिकारी या महिलेचे लग्न जानेवारी 2019 रोजी खारेकुरण येथील मनीष पाटील (वय 36 वर्ष) सोबत झाले. परंतु लग्नानंतर काही दिवसानंतर तिचे सासरी खटके उडू लागल्याने ती आपल्या माहेरी निघून आली होती. त्यानंतर पती मनीष पाटील आणि त्याच्या नातेवाईकांच्या मध्यस्थी नंतर आरती आपल्या सासरी नांदावयास आली. आरती ही शुक्रवारपासून बेपत्ता होती त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी पालघर पोलिस ठाण्यात तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. सोमवारी संध्याकाळी आरतीचा मृतदेह खारेकुरण गावाजवळील त्यांच्या शेतात आढळला. महिलेचा चेहरा, डोकं दगडाने ठेचून विद्रूप करून अत्यंत निर्घुणपणे तिच्या हत्या करण्यात आली.
एका संशयिताला अटक -
याप्रकरणी एका संशयित आरोपी मनीष देसले (वय 22) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आरतीच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आरतीचा पती आणि इतर सासरची मंडळी असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत.