पालघर/वसई - पश्चिम रेल्वेवरील नायगांव-भाईंदर खाडीवरील ब्रिटीशकालीन रेल्वे पूल अखेर तोडण्यास सुरुवात करण्यात आली. हा पूल 150 वर्षांहून जुना असून साधारणपणे 1993पासून रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण होत असताना पूलाला समांतर असे नवीन दोन पूल बांधण्यात आल्यानंतर जुन्या पुलावरून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. नायगांव व भाईंदर स्थानकादरम्यान असलेल्या पाणजू गावातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार होता. मात्र, पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे सांगत रेल्वेकडून हे पूल आता भंगार म्हणून तोडण्यात येणार असल्यामूळे पाणजूवासीयांची उरलीसुरली शेवटची आशा देखील आता संपली आहे. सध्या पूल क्रमांक 75 हा पूर्णपणे तर भाईंदर बाजूचा पूल क्रमांक 73 हा अर्धा तोडण्यास येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ब्रिटिशकाळात पश्चिम रेल्वेवर -
12 एप्रिल 1867रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. नीअल (नालासोपारा), बसीन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यांमधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड अशी त्या काळी मोजकी स्थानके या रेल्वे मार्गावर होती. भाईदर खाडीवर ब्रिटिशांनी पूल क्रमांक 73 व तर नायगांव खाडीवर पूल क्रमांक 75 असे दोन पूल बांधण्यात आले होते. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या या दोन्ही पुलांवरून रेल्वेने 27 वर्षापूर्वी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद केली. या पुलावरुन हलक्या वाहनांसाठी वाहतूक करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याचा फायदा पाणजू येथील ग्रामस्थांना होणार होता. कारण गेली शेकडो वर्ष येथील ग्रामस्थ गावात येण्यासाठी नायगांव येथून बोटीचा वापर करत होते.
अनेकदा मोठ्या दुर्घटनांमध्ये लोकांचा जिवदेखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता रेल्वे प्रशासनाकडून हे ब्रिटिशकालीन पूल तोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'कोरोना नको रे बाबा.. कोरोनाचा अनुभव मी घेतलाय, फार भयानक काम आहे'
याबाबत पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी नितीनकुमार डेव्हिड काय म्हणाले?
भाईंदर खाडीवरील पूल क्रमांक 73 व नायगांव खाडीवरील 75 हे दोन्ही पूल धोकादायक असल्यामुळे ते आता तोडण्यात येणार आहेत. पूल क्रमांक 75 हा पूर्णपणे तोडण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत. तर पाण्याच्या पाईपलाइन असल्यामुळे पूल क्रमांक 73 हा लवकरच अर्धा तोडण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांशी चर्चा करून उर्वरीत पूल तोडला जाईल.