पालघर: तारापूरमध्ये यापूर्वीही आगीच्या आणि बॉयलर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भीषण आगीनंतर स्फोट झाल्याचे 29 जून, 2022 रोजी समोर आले होते. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहाऩी झाली नाही. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. माहितीप्रमाणे, बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडिएटस प्लांट नंबर 56/57 या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. या भीषण आगीनंतर कंपनीत एकापाठोपाठ 8 ते 10 भीषण स्फोट झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते.
नागरिकांना श्वास घेण्यास त्रास: तारापूरमधील कंपनीत लागलेल्या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघाले. त्यामुळे स्थानिक लोकांना श्वास घेण्यास त्रास उद्भवू लागला. आगीमुळे मोठे स्फोट झाल्याने त्या हादऱ्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने प्रचंड आग लागून स्फोट झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
केंबोंड केमिकल कंपनीत झाला होता स्फोट: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केंबोंड केमिकल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना 21 एप्रिल, 2022 रोजी घडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
अचानक लागली आग: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका परिसरातील प्लॉट नंबर E-6/3 व E-4 मध्ये असलेल्या केंबोंड केमिकल या कंपनीत सकाळी दहा वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि बोईसर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
एका कामगाराचा मृत्यू: अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कंपनीतील कामगारांना कंपनीबाहेर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजरचा मृत्यू झाला होता. दुलेश पाटील असे मृतकाचे नाव होते. ते सफाळे येथील रहिवासी होते. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान कंपनीला लागलेल्या या आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
हेही वाचा: Accident in Ajmer: ट्रेलर आणि गॅस टँकरचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, अनेक वाहनांना आग