पालघर (वाडा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. वाडा तालुक्यातील पोशेरी येथे २५ जुलै रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनीधी आहोत असे मानून जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवाव्यात. हे काम करण्यात आपल्याला नक्की यश मिळेल, असे सांगून चव्हान यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा विस्तारक बाबाजी काठोळे, आदिवासी आघाडीचे प्रमुख हरिश्चंद्र भोये, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, विजय औसरकर, आदिवासी आघाडीचे राजू दळवी, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उल्हास सोगले, तालुका प्रमुख संदीप पवार, सरचिटणीस मंगेश पाटील, प्रभाकर पाटील, मनिष देहरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.