पालघर - 'भारत जोडो... संविधान बचाव' या समाजवादी विचार यात्रेचे पालघरमध्ये आज (बुधवार) आगमन झाले. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त व समाजवादी आंदोलनाला 85 वर्षे पूर्ण झाल्याने, स्वातंत्र्य आंदोलन पुनर्स्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. अरुण श्रीवास्तव, डॉ. सुनीलम यांनी या यात्रेचे नेतृत्व केले.
'भारत जोडो...संविधान बचाव' ही समाजवादी विचार यात्रा 30 जानेवारीला गांधी स्मृती दिनी दिल्ली येथून सुरू झाली असून, देशातील 16 राज्यांमध्ये फिरणार आहे. आज या यात्रेचे पालघरमध्ये आगमन झाले. पालघरमधील जनता दल, समाजवादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. देशात वाढती बेरोजगारी, जी.एस.टी खासगीकरण आदी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी या कायद्याविरोधात अनेक आंदोलने उभी राहत आहेत. दुसऱ्या बाजूने काही शक्ती समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत आहेत. मात्र, असे असले तरीही देशात जनवादी, हिंदू-मुस्लीम एकतेचे, अहिंसा यावर आधारलेले जनआंदोलन व राजकारण देखील उदयास येत आहे. गांधीजींची हत्या करण्यात आली, मात्र देशभरात सुरू असलेल्या अनेक जनआंदोलनाच्या माध्यमातून गांधीजी आजही जिवंत आहेत.
महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गानेच देशाचा विकास होऊन देश पुढे जाऊ शकतो. याच उद्देशाने, ही 'भारत जोडो...संविधान बचाव यात्रा' निघाली आहे. 23 मार्चला डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जन्मदिनी व शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीला हैदराबाद येथे यात्रेच्या पहिल्या चरणाचे व दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण यात्रेचे समारोप होणार आहे.