पालघर - ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडिओ अनेकवेळा पाहायला मिळतात. मात्र, ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या 55 ते 60 बारबालांची भररस्त्यावर होणारी परेड भाईंदरमध्ये पाहायला मिळाली. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याही भुवया उंचावल्या.
काशीमीरा पोलिसांनी बांगलादेशी असल्याच्या संशयावरुन बारबालांची चौकशी सुरू केली. मात्र, वाहतूक कोंडीमुळे बारबालांना पोलीस ठाण्यात चालत न्यावे लागले.
काशीमीरा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक राम भालसिंग व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री आठच्या सुमारास भाईंदरमधील नऊ ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. या बारबालांमध्ये काही बांगलादेशी तरुणी असल्याचा पोलिसांना संशय होता. यासाठी पोलिसांनी अधिक चौकशीसाठी सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी बारबालांचा नोकरनामा, नोंदणी, आदींचीदेखील पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी बारबालांचे आधारकार्ड व अन्य ओळख पुराव्यांची खातरजमा करुन त्यांना सोडून दिले.
'रस्त्यावर परेड'
ताब्यात घेतलेल्या 55 ते 60 बारबालांना पडताळणीसाठी दहिसर चेकनाका येथील पोलीस चौकीत न्यायचे होते. परंतु, या भागात मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मोठ्या संख्येने असलेल्या बारबालांसाठी पोलिसांकडे पुरेशी वाहने नसल्याने त्यांना चालतच चौकीत नेण्यात आले.
बारबाला रस्त्यावरून जात असल्याचा प्रकार रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका तरुणीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच काशीमीरा पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. सध्या सर्व स्तरातून या परेडवर टीका होत असून, याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वकील मंडळींमधूनही या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. कारवाई पूर्वनियोजीत असल्यास पोलिसांनी गाड्यांची व्यवस्था करण्याची आवश्यकता होती, असा सूर वकिलांमध्ये चर्चेत आहे.