पालघर - विरारमध्ये दारूची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करणारा बारमालक व त्याच्या साथीदाराला विरार पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सदर कारवाईत पोलिसांनी ६२ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. संतोष विश्वनाथ महांती (बारमालक) व त्याचा साथीदार आकाश सावंत अशी दोघांची नावे आहेत.
सध्या देशभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यसरकार मार्फत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यु व त्यानंतर 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या दरम्यान मद्याच्या अवैध विक्रीला उत आला आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांकडून ज्यादा पैसे उकळून मद्यविक्री करण्याचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. सहजरित्या मद्य उपलब्ध होत नसल्याने ग्राहकही हवी ती किंमत मोजून दारू विकत घेत आहेत. असाच प्रकार विरार पश्चिमेकडील ओशियन बार मार्फत सुरू होता.
बारमालक संतोष महंती याने इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर 'द लीकर मॅन' या नावाचे अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून आपल्याकडे दारू मिळत असल्याची पोस्ट त्याकडून अपलोड करण्यात आली होती, याबाबतची माहिती वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना मिळाल्यानंतर त्यांनी विरार पोलिसांना सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून सदर व्यक्तीचा मोबाईल क्रमांक काढून त्याकडे दारूची मागणी केली होती. पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार बारमालकाने विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात दारूची डिलिव्हरी देण्यासाठी बोलावून घेतले होते. यादरम्यान पोलिसांनी सापळा रचून बारमलक व त्याच्या साथीदाराला शिताफीने अटक केली तसेच त्याकडे अधिक चौकशी केली गोडाऊनमध्ये अवैध दारूचा साठा असा एकूण 62 हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.