पालघर - तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी यांनी पालघर व डहाणू तालुक्यातील किनारपट्टीचा दौरा केला. तसेच यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली. डहाणू येथे चिकू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. तर सरावली येथील चिकू उत्पादक शेतकऱ्यांची बैठकही त्यांनी यावेळी घेतली. पालघरमधील माहिम टेंभी या गावाला भेटी देऊन नुकसान झालेल्या बोटींचीदेखील पाहणी केली.
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये -
शेतकऱ्यांवरील संकट मोठे आहे. तसेच नुकसान भरपाईदेणारा जीआर तोकडा आहे. त्यामुळे शासनाने अधिकचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी नुकसानीच्या दाहकतेचे वास्तव चित्र कागदोपत्री दिसेल, अशा पद्धतीने पंचनामे करावे. आम्ही विधानसभेत, प्रसंगी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांचे म्हणणे, व्यथा आणि मागण्या आक्रमकपणे मांडू. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवानह भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केले. तसेच गुजरातला पंतप्रधानांनी मदत जाहीर केली. मात्र, देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा चर्चा केल्याची माहिती आमच्याकडे आहे. राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून पाठविण्यात दिरंगाई करू नये, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - भारतीय रेल्वेतर्फे एका महिन्यात चालवल्या गेल्या दोनशे 'ऑक्सिजन एक्सप्रेस'