पालघर - पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे 'बोहाडा' उत्सव अत्यंत उत्साहात पार ( Bohada Festival In Palghar ) पडला. सुमारे २०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा जगंदबा यात्रा उत्सव 'बोहाडा' म्हणून ओळखला जातो. या बोहाडा उत्सवाला आदिवासी व सर्व समाजवर्गातील ( Bohada Festival Celebrate ) भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
काय आहे बोहाडा उत्सव?
मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे 'बोहाडा' हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासी बहुल भागात हा बोहाडा उत्सव होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून सुरू होऊन सात दिवस चालतो. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात.
सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगं काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू, या सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुरामध्ये युद्ध होते. त्यात महिषासुराचा वध करून विजयी जगदंबा देवीच्या मिरवणुकीने यात्रेची सांगता होते.
हेही वाचा - Anil Parab Vs Kirit Somaiya : किरीट सोमैया नौटंकी करतात, रिसॉर्टबद्दल मंत्री अनिल परबांनी दिले 'हे' उत्तर