पालघर - गोमांस विक्रीवर बंदी (Beef ban in Maharashtra) असताना देखील गोमांसाची वाहतूक (Illegal smuggling of beef) करणाऱ्यांवर कारवाई करत मुंबई- अहमदाबाद महामार्गावर कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारो किलो गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. तमिळनाडूहून ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई करत तब्बल 21 हजार 18 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
21 हजार 18 किलो गोमांस जप्त -
पालघर जिल्ह्यात मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील कासा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून कंटेनरमधून गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने केली. या कारवाईत पोलिसांनी गोमांस वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त केला असून त्यातील तब्बल 21 हजार 18 किलो गोमांस जप्त केले आहे.
हे ही वाचा - Omicron - धारावीवर ओमायक्रॉनचे सावट, 2794 पैकी 13 परदेशी प्रवासी पाॅझीटिव्ह
तामिळनाडू येथून ठाणे, मुंबईत नेण्यात येणार होते गोमांस; 2 आरोपींना अटक -
कारवाईत जप्त करण्यात आलेले गोमांस तामिळनाडू येथून मुंबई, ठाणे येथे नेण्यात येणार होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून के. राजेंद्र वनियार आणि रंजीत कुमार गणेशन अशी या दोन आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्याकडून सुरू आहे.