पालघर - केळवे मतदानादरम्यान मतदारयादीत नाव नसल्याने बुथवर वाद झाला. हा वाद रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा राग मनात धरून या महिलेवर एकाने कोयत्याने वार केला. हा आरोपी 19 महिन्यांपासून फरार होता. त्याला पकडण्यात केळवे पोलिसांना यश आले आहे.
कोयत्याने सपासप वार
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी केळव्याच्या आदर्श विद्यामंदिर या शाळेत मतदान केंद्र होते. या येथे काही राजकीय पक्षांनी मतदारयादी शोधण्यासाठी टेबल (बूथ) मांडले होते. केळवे पूल नाका येथे राहणारी महिला दुपारी साडेतीनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बूथवर काही जणांशी बोलत उभी होती. यावेळी उमेश ऊर्फ मोरगा भोईर ही व्यक्ती मतदारयादीत नाव शोधण्यासाठी तिथे आली. मात्र मतदारयादीत नाव नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांशी त्याने शिवीगाळ केली. त्यावेळी संबंधित महिलेने उमेश भोईर यास रोखले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर महिला शितलाई मंदिराजवळ रिक्षा थांब्यावर आपल्या पतीला भेटायला गेल्या. त्यांना घडलेली घटना सांगत असताना भोईर याने कोयत्याने महिलेवर वार केले व फरार झाला.
19 महिन्यांपासून फरार
केळवे सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी उमेश भोईर हा मागील 19 महिन्यांपासून फरार होता. फरार आरोपी आपल्या आजीला भेटण्यासाठी पालघर तालुक्यातील झांजरोळी येथे येणार असल्याची माहिती केळवे पोलिसांना मिळाली. आरोपी झांजरोळी येथे पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक आरोपीस पालघर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.