डहाणू (पालघर) - जव्हार राज्य महामार्गावर डहाणू तालुक्यातील सारणी येथे भीषण अपघात झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड नेणारा पिकप टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने लग्न वऱ्हाडाचा पिकअप टेम्पो पलटी झाला. या अपघातात जवळपास तीस पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील सारणी डोंगरापडा खिंडीत वऱ्हाडाने भरलेल्या पिकअपचा अपघात झाला. यामध्ये 33 लोक जखमी झाले असून त्यापैकी 5 गंभीर जखमी झाले आहेत. तलावली येथे लग्नासाठी सारणी, डोंगरपाडा येथून लहान मुले, महिला व वयोवृद्ध असे एकूण 33 जण पिकअप टेम्पो घेऊन निघाले होते. सारणी येथे डहाणू-जव्हार मुख्य रस्त्यावर अचानक वाहन समोर आल्याने पीकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वऱ्हाडाने भरलेला पिकअप जागीच उलटला. या भीषण अपघातात गाडीत असलेले सर्व वऱ्हाडी जखमी झाले आहेत. यापैकी पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले असून देहू दगला (वय 55), अशोक दगला(वय 14), सुनंदा दगला (वय 12), भारती दगला (वय 17) यांना वापी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच इतर जखमींना आसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.