पालघर - वसई पूर्व महामार्गानजीक असलेल्या जैन धर्मीयांच्या चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दानपेटी, सिंहासन, छत्रासह 11 पुरातन व मौल्यवान अशा पंचधातू व चांदीच्या मूर्त्या चोरल्या आहेत.
वालिव पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. अवघ्या पंधरा दिवसात वसई विरारमध्ये जैन धर्मीयांच्या या दुसऱ्या मंदिरात चोरी झालेली आहे.
पुरातन मौल्यवान मूर्ती गेल्या चोरीला
मूंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ शेल्टर हाॅटेल, तुंगार फाटा येथे जैन धर्मीयांचे 'श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे' देवस्थान आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 31 डिसें.) पहाटे 3:30 च्या सुमारास या मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत विविध भगवान व 24 तिर्थनकारांच्या मूर्तींसह चांदिचे सिंहासन, छत्र व दानपेटी चोरून पोबारा केला. ही चोरी चोरट्यांनी पंधरा मिनिटांत केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! वसईमध्ये आईनेच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या
हेही वाचा - पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकांमधील 25 जागांसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल