पालघर/वसई :- वसईच्या किल्लाबंदर येथून २५ नोव्हेंबर रोजी मासेमारी करण्यासाठी अरबी समुद्रात निघालेली 'लोकमान्य' नावाची मच्छिमार बोट ११ मासेमारांसह समुद्रकिनाऱ्यापासून ९१ नॉटिकल माईल्स अंतरावर बंद पडली आहे. इंजिन बिघाडामुळे चार दिवसांपासून ही बोट अरबी समुद्रात बंद अवस्थेत अडकून पडली आहे. त्या बोटीला बाहेर काढण्यात प्रशासन मदत करत नसल्याने मच्छिमार बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ही बोट भर समुद्रात बंद पडल्याचा निरोप दुसऱ्या मासेमारी करणाऱ्या बोटीमार्फत मच्छिमारांना मिळाला त्यानुसार मच्छिमार संस्थांकडून ही बोट प्रशासनाकडून बाहेर काढण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र संबंधित प्रशासन वेळीच मदतकार्य करत नसल्याने बोटीवर अडकलेल्या मच्छिमारांचे कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत.
प्रशासनाकडून मदत नाही -
चार दिवस उलटूनही या बोटीत अडकलेल्या मासेमारांच्या मदतीसाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाहीत. संपूर्ण बोटच बंद असल्याने बोटीवरील खलाशी व मासेमारांचा आपल्या कुटुंबाशी संपर्क नाही. शिवाय भर समुद्रात चालणाऱ्या जहाजांमुळे रात्रीच्या अंधारात बोटीला लाईटही नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने जर काय बरे वाईट झाल्यास कोण जवाबदार? असा सवाल वसई सागरी कोळी मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष व्हॅलेंटाईन मिरची यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने मदत न केल्यास कोळीबांधव आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा -पुणे : नवले पुलाजवळ सहा वाहनांचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार गंभीर
हेही वाचा -काशीद समुद्रात बुडणाऱ्या नऊ जणांना जीवरक्षकांनी वाचवले, पंधरा दिवसातील दुसरी घटना