वाडा (पालघर) - देवगाव येथील माधवराव काणे अनुदानीत शासकीय आश्रमशाळेतील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या 9 मुलांनी 'मिशन शौर्य 2019' मध्ये भाग घेत जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पार केले आहे. त्यांच्या या यशाचे आणि सहभागी मुलांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी अभिनंदन केले आहे.
सुग्रीव, सुरज, अंतुबाई, चंद्रकला, मनोहर, मुन्ना, अनिल, हेमलता आणि केतन जाधव, अशी या 9 जणांची नावे आहेत.
शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या 'मिशन शौर्य 2019' या एव्हरेस्ट मोहिमेत केतन जाधव याच्यासह एकूण 9 आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विविध ठिकाणी घेतलेल्या खडतर प्रशिक्षणानंतर मुलांनी हे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.
वाडा तालुक्यातील देवगाव येथील आश्रमशाळेतील केतन जाधव हा मूळचा जव्हार तालुक्याचा आहे. 23 मे रोजी भल्या पहाटे 5.10 वाजता या 9 आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला आहे.