सातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघामध्ये प्रचाराचा धुरळा उडाला आहे. आपल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक अखेरच्या चार दिवसांत जाहीर सभा घेणार आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये तर शरद पवार यांची रहिमतपूर इथं सभा होणार आहे. शरद पवारांचा साताऱ्यात एक दिवस मुक्काम देखील आहे. यामुळे राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत.
साताऱ्यात शरद पवारांच्या पाच सभा : कराड उत्तर, फलटण, माण खटाव, वाई आणि कोरेगाव या मतदार संघातील आपल्या उमेदवारांसाठी शरद पवार पाच सभा घेणार आहेत. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून सातारा जिल्ह्यानं शरद पवार यांची पाठराखण केली. त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. परंतु, 2019 पासून शरद पवार यांच्या या बालेकिल्ल्याला हादरे बसू लागले. ते आता अधिक तीव्र झाले आहेत.
कराड दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा : कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज साडेअकरा वाजता मलकापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या आहेत. आता या मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे.
कराड उत्तरमध्ये योगींच्या सभेबद्दल उत्सुकता : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन 17 नोव्हेंबरला करण्यात आलंय. योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे', या नाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशा स्थितीत पुरोगामी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काय बोलणार, याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.
प्रियांका गांधींच्या सभेचंही नियोजन : कराड दक्षिणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या सभेची तारीख निश्चित झालेली नाही. प्रियांका गांधींची सभा झाल्यास सातारा जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.
हेही वाचा :
- "13 हजार महिला बेपत्ता, तर महिला अत्याचाराच्या तक्रारी...", शरद पवारांनी 'महायुती'ला सुनावले खडेबोल
- 'लाडकी बहीण योजना' आणली, पण 850 पेक्षा अधिक मुली गायब झाल्यात त्याचं काय", शरद पवार यांचा टोला
- "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा