पालघर - जिल्ह्यात सागावे, पाली, सत्पाळा या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. पालघर तालुक्यातील एक आणि व वसईतील दोन अशा एकूण तीन ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81.45 टक्के मतदान झाले. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावातील वयोवृद्धासह अनेक मतदार सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर दाखल झाले. कोरोनाचे सावट पाहता मतदान केंद्रावरही मतदात्यांचे तापमान तपासून विशेष काळजी घेण्यात आली. शिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
![मतदानाची आकडेवारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-03-8145percentvoting-vis-mh10044_15012021220218_1501f_1610728338_63.jpg)
पालघर जिल्ह्यात 81.45 टक्के मतदान -
पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीमध्ये 4 जागांसाठी 8 उमेदवारांमध्ये लढत असून, वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पालघर जिल्ह्यातील तीनही ग्रामपंचायतीत आज साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 81.45 टक्के मतदान झाले. पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीत 631 मतदारांपैकी 564 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सागावे ग्रामपंचायतीत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 89.38 टक्के मतदान झाले. वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीत एकूण 623 मतदारांपैकी 515 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाली ग्रामपंचायतीत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 82.33 टक्के मतदान झाले. सत्पाळा ग्रामपंचायतीत 2 हजार 849 मतदारांपैकी 2 हजार 260 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 79.33 टक्के मतदान झाले.