पालघर ( वाडा ) - पाऊस अवघ्य काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बियाणे घेण्यासाठी गर्दी करत आहेत. वाडा तालुक्यात महाबीजच्या भात पिकाचे बियाणे पन्नास टक्के अनुदानावर वाटप होत असल्याने शेतकऱयांनी ते घेण्यासाठी गर्दी केली आहे.
वाडा तालुक्यातील वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून महाबीज महामंडळाच्या कर्जत -3 व कर्जत- 7 हे खरीप हंगामातील भातपीक बियाणे वाडा येथील कृषी विभागाच्या गोडावूनच्या ठिकाणाहून शेतकरी वर्गाला वाटप करण्यात येत होते. शेतकरीवर्गाला पन्नास टक्के अनुदानावर 475 रुपये 25 किलोग्रॅमची बियाणांची बॅगही देण्यात येत आहे.
हळवार भात जातीचे कर्जत 3 व कर्जत 7 या वाणाचे वाटप वाडा पंचायत समितीचे सभापती अश्विनी शेळके व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत केले गेले.
सद्यास्थितीला 175 क्विंटल बियाणे वाटप केले आहेत. 100 क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत, तर 75 क्विंटल अधिक बियाणांची मागणी करण्यात आली आहे. शेतकरीवर्गाच्या मागणीने अधिक बियाणे उपलब्ध होईल. वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना ही माहीती दिली. तर हे बियाणे पन्नास टक्के अनुदानाने मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दिलासादायक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.