पालघर - जिल्ह्यातील जव्हार येथील विनवल आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. यात 38 मुले आणि तीन शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या रुग्णांना जव्हार येथील कोविड केअर सेंटर यथे दाखल करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील विनवल आश्रमशाळा ही बारावीपर्यंत आहे. जव्हार शहरापासून 12 किलोमीटरवर ही शासकीय आश्रमशाळा आहे. जव्हार तालुका आदिवासी समाज वस्तीचा आहे. दरम्यानच्या काळात येथील कोरोना संसर्ग शून्यावर आला होता. तसेच पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. मात्र, पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - किसान क्रेडीट कार्ड देण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल!
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लागण....
आश्रमशाळेतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकला या प्रकारची लक्षणे आढळून आले होते. यानंतर 9 मार्चला त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. यासोबतच शाळेतील तीन शिक्षकांचीही चाचणी करण्यात आली. यात या तीन शिक्षक कर्मचाऱ्यांसह 38 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना जव्हार येथील कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या आढळलेली लक्षणे गंभीर स्वरुपाची नसून साधी आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी किरण पाटील यांनी दिली.
हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील 11 मार्चच्या कोरोना अहवालात पालघर तालुक्यात 06, डहाणु येथ 06, जव्हार तालुक्यात 30 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे.