पालघर - पालघर-बोईसर रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे २९१ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यामधील काही झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा - विकास आवश्यकच, पर्यावरणाचा ऱ्हास करून केलेला विकास काय कामाचा? - अतुल देऊळगावकर
पालघर-बोईसर रस्त्याचे दोन फूटांनी रुंदीकरण करण्यात येत असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे या रुंदीकरणाला अडथळा ठरत आहेत. परिणामी ही झाडे तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वन विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल तसेच वृक्ष अधिकारी यांनी परवानगी दिली असून, या वृक्षतोडीच्या बदल्यात पावसाळ्यादरम्यान तीनपट वृक्षारोपण करण्याचे नमूद केले आहे. मात्र, रास्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्राणवायू देणारी ही झाडे तोडल्यास पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे, असे ही नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - 'आरे आंदोलनकर्त्यांची ठाणे कारागृहातून सुटका'
रास्ता रुंदीकरण करताना रस्त्यालगत असलेल्या झाडांची कत्तल न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने इतर पर्यायांचा विचार करुन झाडांची होत असलेली कत्तल तातडीने थांबवावी. अशी मागणी या निमित्ताने समोर येत आहे. तसेच ही झाडे तोडण्याऐवजी पर्यायी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग शोधावा आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा. अशीही मागणी या निमित्ताने समोर येत आहे.