पालघर - आदिवासी एकता परिषदेच्यावतीने पालघर येथे 27 व्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्गघाटनाच्या कार्यक्रमाला छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया उईके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या संमेलनात निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला संस्कृतीच्या संवर्धनाविषयी आणि आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे.
समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन भेदभाव नसेलेली व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आदिवासी संस्कृती जगापुढे आणली पाहिजे. आदिवासी संस्कृतीची जपवणूक करण्याचे काम आदिवासी एकता परिषदेमार्फत केले जात आहे. आदिवासी बांधवांना विविध संधी उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न करेल, असा विश्वास छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया उईके यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - प्लास्टिकमुक्त राजस्थानचं स्वप्न उराशी बाळगून तरुण करतायेत शहरांची सफाई
या महासंमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपारिक अवजारे, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात देशातील विविध भागातून लाखो आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत.
मध्यप्रदेशचे मंत्री ओंकारसिंह मरकाम, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम धोदडे, महासचिव अशोकभाई चौधरी, परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, विविध विभागांचे अधिकारी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.