पालघर - भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या 24 वर्षांच्या एका आरोपीने नवी दिल्लीत आयएफएस ऑफिसर असल्याचा बनाव रचला. यानंतर त्याने एका महिलेस नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पीडित महिलेच्या पतीने गुरुवारी रात्री नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बनावट अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. यूपीएससी परीक्षा पास करून फॉरेन डिपार्टमेंटमध्ये सल्लागारपदावर नोकरी देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते.
अधिकारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक...तोतया 'सरकारी बाबू'चा बनाव उघड नालासोपाऱ्यात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करणारे दिनेश बाबुराव तांबे (वय - 42) यांच्या पत्नीची नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. निळेगावातील साई निवास टॉवरमध्ये राहणाऱ्या आरोपी प्रेम वाकापल्ली (वय - 24) हा मूळचा कर्नाटक राज्यातील आहे. त्याने पीडितेला नवी दिल्लीत आयएफएस अधिकारी असल्याचे सांगितले. पीडित महिला आणि तिचे पती आरोपीच्या घरी नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. आरोपीने दिल्लीच्या आयएफएस या विभागात ज्युनिअर लीगल कन्सल्टंटची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. यावेळी त्याने स्वत:चे बनावट ओळखपत्र आणि अन्य प्रमाणपत्रे देखील दाखवली. मात्र ते बनावट असल्याचे भासले. गुरुवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी प्रेमला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्याच्याकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सही व शिक्के असलेली बनावट कागदपत्रे सापडल्याचेही प्राथमिक वृत्त आहे. तसेच आरोपीला परदेशी भाषा येत असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.