पालघर - डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचारी आणि रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक अशा १८७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकीच हे २४ जण आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन केलेले ९ कंत्राटी कामगार, १० रुग्णांचे नातेवाईक तसेच आणखी ५ संशयित, असे २४ जण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. अशा पलायन करणाऱ्या रुग्णामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या रुग्णांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.