पालघर - जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सातपाटी येथे घराचे छत कोसळले आहे. यामध्ये ज्येष्ठा व्यक्तीसह एक महिला जखमी झाली आहे.
सातपाटी येथील अग्निमाता गणेशोत्सव मंडळ परिसरात राहणारे गणपत विष्णू पाटील (वय 85 वर्ष) आणि त्यांची मुलगी वंदना (वय 55 वर्ष) हे घरात झोपले होते. त्यावेळी घराची भिंत कोसळून छप्पर खाली कोसळले. यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यामुळे ते मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकताच शेजारी त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला.
दरम्यान पालघर तालुक्यात देखील घर कोसळून ४ जण जखमी झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले आहे. तसेच शासन स्तरावरून मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.