पालघर - डहाणू तालुक्यातील अस्वाली गावातील एका मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सतीश लाडक्या बुजड (वय 13) असे या मृृृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सांयकाळी ही दुर्दैवी घटना घडली. पाय घसरून पडल्याने तो ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला.
डहाणू तालुक्यातील बोर्डीनजीक असलेल्या अस्वाली गावातील सतीश बुजड हा मुलगा शुक्रवारी सायंकाळी घरानजीकच्या ओढ्याच्या प्रवाहात पाय घसरून पडला. मुसळधार पाऊस असल्याने या परिसरात मागील काही दिवसांपासून सल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. स्थानिकांना सतीश पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच तत्काळ त्याचा शोध सुरू केला. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले. दरम्यान आज सकाळच्या सुमारास सतीशचा मृतदेह अस्वालीतील जुन्या आश्रमशाळे जवळील बंधाऱ्यात आढळून आला.
या घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली आहे. सतीशच्या मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऐन गणेशोत्सव काळात ही दुर्दैवी घटना घडली आहे.