पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणी दाखल तीन गुन्ह्यांतील १०१ आरोपींवर आज डहाणू न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने, दाखल तीन गुन्ह्यांपैकी, तिघांच्या हत्येच्या गुन्ह्यात (कलम ३०२) पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने, या गुन्ह्यात न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोन गुन्ह्यांपैकी खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिहेरी हत्या प्रकरणात कासा पोलिसांनी ११० आरोपींना अटक केली असून यातील ९ जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली. उर्वरित १०१ आरोपींविरोधात कासा पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा जमावकडून तिघांना वाचवताना पोलिसांवर हल्ला केल्याचा, दुसरा गुन्हा हा तिघांना ठार मारल्याचा आणि तिसरा गुन्हा आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांवर हल्ला केल्याचा आहे. अटक केलेल्या १०१ आरोपींना १८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज या प्रकरणात पुन्हा सुनावणी करण्यात आली. तेव्हा एका गुन्ह्यात न्यायालयीन तर इतर गुन्ह्यांत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर गाजले असून, हे प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा - गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांचा प्रतिकात्मक दंगल नियंत्रण सराव
हेही वाचा - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण; कासा पोलीस ठाण्यातील आणखी ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन