उस्मानाबाद- पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी कर्मचार्यास मंगळवारी कामाचे वाढीव बिल काढावे म्हणून माजी उपसभापती व अन्य एकाने मारहाण केली. त्यामुळे रोहयोच्या कंत्राटी कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. तर याच प्रकरणात गटविकास अधिकारी यांनाही शिवीगाळ करण्यात आली होती. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यात मारहाणीच्या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. तर शिवीगाळ केल्या प्रकरणीचा विषय माफी मागितल्याने मिटला आहे.
हेही वाचा- कोरोना विषाणूमुळे जनतेने घाबरून जाऊ नये - राजेश टोपे
रोहयो विभागातील तांत्रिक सहाय्यक अभिजित कदम हे कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव व गडदेवधरी येथील मनोज रणखांब यांनी गडदेवधरी येथील गाव अंतर्गत 2016-17 मध्ये झालेल्या रस्ता कामाचे बिल वाढीव लिहावे यासाठी मारहाण केली. या कामाचे बिल 29 हजार 937 रुपये आहे. त्यात त्यांनी वाढीव 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबतचा प्रकार गट विकास अधिकार्यांना सांगण्यास कदम गेले असता, त्यांना धक्काबुकी करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असे प्रकार वारंवार होत आहेत. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, हे रोहयो अंतर्गत रस्ते व सार्वजनिक कामे अनधिकृत करण्यास कर्मचार्यावर सतत दबाव टाकून मारहाण करत असल्याचा आरोप त्या निवेनात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ कार्यवाही करुन अशा लोकप्रतिनिधींपासून कंत्राटी कर्मचार्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.