उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातलगत असलेल्या सांजा गावातील तरुणाने जातपंचायतीने दिलेल्या निर्णयाला आणि वसुलीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमनाथ छगन काळे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर जातपंचायतीच्या पंचांना अटक करण्याच्या मागणी करत मृताच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पुरुगामी महाराष्ट्रात बेकायदेशीर असलेल्या जातपंचायतीच्या निर्णयाने एकाचा बळी गेल्याने समाजसेवकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पंचांनी अनैतिक संबंधाचा आरोप करत 2 लाखांचा ठोठावला होता दंड
याबाबत अधिक वृत्त असे की, सोमनाथ काळे यांचे त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात-पंचायत भरवली होती. या जात पंचायतीला पंचांनी सोमनाथला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, त्यापैकी वीस हजार रुपये दंड वसूल देखील केला. मात्र उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये वसूल करण्यासाठी जातपंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता, असा आरोप सोमनाथच्या नातेवाईकांनी केला आहे.
पैसे देण्यास विलंब केल्यास घृणास्पद शिक्षेची धमकी
दंडाचे पैसे देण्यास विलंब केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी सोमनाथला सातत्याने पंचाकडून देण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून सोमनाथ व त्याच्या पत्नीने 22 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र काही दिवसाच्या उपचारांनंतर सोमनाथच्या पत्नीची प्रकृती बरी झाली. मात्र सोमनाथ प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले.
उपचारादरम्यान सोमनाथचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश
उपचारादरम्यान मंगळवारी सोमनाथचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी मृत्यूदेह घेऊन आलेली शववाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेत आक्रोश केला. जोपर्यंत जातपंचायतीच्या पंचांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तहसीलदार गणेश माळी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अत्यंविधीसाठी नेला.
पंचांवर गुन्हे दाखल करून पीडित परिवाराच्या पुनर्वसनाची मागणी
घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. पुरुगामी महाराष्ट्राला डाग लावणारी ही घटना आहे. यामागे जातपंचायतीच्या दबाव असल्याचं उघड झाले आहे. महाराष्ट्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी 2017 साली सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनवला होता. त्याअंतर्गत जातपंचायतीच्या पंचांवर गुन्हे दाखल करून अटक करावी व पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचायत मूठमाती अभियानाचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
हेही वाचा - प्रकरण मिटवण्याऐवजी जात पंचायतीने टाकले वाळीत, पुन्हा जातीत घेण्यासाठी मागितली लाच
हेही वाचा - जातपंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकले वाळीत, पुरोगामी पुण्यातील प्रकार