उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी गावात घरावर 'तिरंगा' झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादात गावाच्या पोलीस पाटलांना तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली. विठ्ठल घोडके असे मारहाण झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. त्यांना अमोल बबन घोडकेसह इतर ५ जणांनी लोंखडी सळई तसेच दगडांनी जबर मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल घोडके याने त्यांच्या राहत्या घरावर 'तिरंगी' झेंडा (राष्ट्रध्वज) लावला होता. सोसाट्याच्या वारा सुटल्यामुळे तो राष्ट्रध्वज खाली पडला. त्यानंतर त्याने पुन्हा राष्ट्रध्वज घरावर लावला. यानंतर विठ्ठल घोडके यांनी पोलीस पाटील या नात्याने अमोलला सांगण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रध्वज खाली पडून त्याचा अवमान होत आहे. त्यामुळे त्याचा अवमान होऊ नये म्हणून राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक घरात काढून ठेव, राष्ट्रध्वज घरावर लावू नकोस, असे सांगितले.
अमोल ही गोष्ट ऐकायला तयार झाला नाही. यातूनच पोलीस पाटील व अमोल घोडके यांच्यामध्ये वाद झाला. हाच वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. तेव्हा अमोल घोडके व अमोलच्या साथीदारांनी विठ्ठल घोडके यांना व त्यांच्या घरच्यांना लोखंडी सळईने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. व त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
पोलीस पाटील संघाने केला निषेध -
धनगरवाडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल घोडके यांना झालेल्या मारहाणीबद्दल पोलीस पाटील संघटनेने निषेध व्यक्त केला असून या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.