उस्मानाबाद - कोरोना विषाणूंमुळे सर्वसामान्य लोकांची रोजी रोटी बुडाली. हाताला काम नाही आणि घरात अन्नधान्य नाही, त्यामुळे लोकांची भटकंती सुरू आहे. आमच्याकडे रेशनकार्ड नाही आमची लेकरं बाळ उपाशी आहेत, आम्हाला धान्य द्या अशी मागणी करत शहरातील अमृत नगर भागातील ३० ते ४० महिला जिल्हा शिवसेना कार्यालयाच्या बाहेर २ तास ठिय्या मांडून बसल्या होत्या.
या सर्व महिला शहरात मजुरी, धुणीभांडी करणाऱ्या आहेत. मात्र, आता त्यांचे काम बंद पडल्याने महिलांचे हाल होत आहेत. अशाच काही महिला आम्हाला धान्य द्या, या मागणीसाठी नगरपालिकेच्या जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर जमा झाल्या. तिथे येण्यापूर्वी त्या ओमदादा यांच्या कडे गेल्या. मात्र, त्यांना तुम्ही नगरपालिकेकडे जा असे म्हणत त्यांनी हाकलून दिले. त्यानंतर या महिला शिवसेना कार्यालयासमोर जमा झाल्या. जमा झालेल्या महिलांना विचारले असता त्यांनी आम्ही स्वतःहून आल्याचे सांगितले.
आमच्याकडे रेशनकार्ड नाही. हा रोग आला नसता तर, आम्ही काम करून खाल्लं असतं. रेशन देता येत नसेल तर उस्मानाबाद चालू करा आम्ही काम करून खाऊ, अशी मागणी या महिलांची होती. त्यानंतर नगरपालिकेतील कर्मचारी सांगळे आणि त्यांचे दोन सहकारी तिथे आले त्यांनी त्या महिलांची यादी बनवून त्यांचे आधारकार्ड व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास सांगितले आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशांना धान्य देण्याची ग्वाही दिली. यानंतर या महिला तेथून उठून आपापल्या घराकडे गेल्या.