उस्मानाबाद - परंडा शहरातील कुर्डूवाडी रोडवरील अजिंक्यराजे पेट्रोलपंपावर (दि.९सप्टेंबर) रात्री अडीचच्या सुमारास दरोडा टाकून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रसंगात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाले असून, पंपावरचे काही कर्मचारी दरोड्यात सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार आहे.
हेमंत निवृत्ती शिंदे यांच्या मालकीचा कुर्डूवाडी रोडवर पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील कामगारांना झोपेतून उठवून गंभीर जखमी केले. या मारहाणीत कामगार प्रशांत रामचंद्र नरसाळे (वय ३५, रा. डोमगाव)जखमी झाले असून, पंपावरील कपाटाच्या चाव्या हिसकावून एक लाख ९२ हजार ५७० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली.
हेही वाचा अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड
साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोदे, पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पंपावरील कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय आल्याने त्यांनी ३ कामगारांना ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.