उस्मानाबाद - जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले ज्ञानराज चौगुले यांनी आमदार आदर्श गाव म्हणून दत्तक घेतलेल्या गावचा विकास हा फक्त रस्त्यावर मर्यादित असल्याचे पाहायला मिळत आहे. चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील उदतपूर हे भूकंपग्रस्त गाव दत्तक म्हणून नोव्हेंबर 2015 मध्ये घेतले असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या भूकंपग्रस्त गावांमध्ये भूकंपानंतर बर्यापैकी कामे झाले आहेत.
हेही वाचा -सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील
हे गाव हागणदारीमुक्त गाव म्हणून दत्तक घेण्यापूर्वीच परिचित होते. सर्व गावात नळयोजना देखील कार्यान्वित होती. रस्ते बर्यापैकी होते. अशा चांगल्या गावाला ज्ञानराज चौगुले यांनी दत्तक घेऊन फक्त डागडुजी करण्याचे काम केले आहे. आमदारांनी गाव दत्तक घेतल्यापासून गावातील रस्ते मजबूत करण्याव्यतिरिक्त चौगुले यांची कामगिरी शून्य आहे. या गावात झालेल्या योजनांचे श्रेय गावातील लोक आमदारांपेक्षा सरपंचांनाच अधिक देतात. त्यामुळे आमदारांनी फक्त दत्तक योजना राबवण्यासाठी हे गाव दत्तक घेतले होते का? हा प्रश्न पडतो.
हेही वाचा - भाजपने राणेंना गंडवले का? आता काय करणार राणे?
गावातील सरपंच माधव पाटील यांनी 14 व्या वित्त आयोगातून विद्युतरोधक यंत्र, दलित वस्तीत सोलार हिटर, जलशुद्धीकरण पंप, जिल्हा परिषद शाळा ई लर्निंग करणे तसेच धूर फवारणी यंत्र यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या मानाने आमदार चौगुले यांचे काम लोकांना समाधानकारक वाटत नाही.
गावाला अपुऱ्या सुविधा
उदतपूर गावची लोकसंख्या चौदाशेपेक्षा अधिक आहे, तर तालुक्यापासून 18 किलोमीटर असलेल्या या गावाला फक्त दोन बसची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या गावात फक्त सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून मुलींना आणि मुलांना पुढील शाळेसाठी शेजारील तावशी येथील शाळेत चालत जावे लागते. सकाळी आठ व संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान फक्त एक बस या गावातून जाते. त्यामुळे इतर वेळी लोकांना प्रसंगी चालत किंवा खासगी वाहनाने शहर गाठावे लागते.
या गावात दोन अंगणवाड्या असून यातील एक अंगणवाडी जीर्णावस्थेत झाली आहे. त्यामुळे नवीन बांधकामासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्यापही अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना अशाच जीर्ण झालेल्या अंगणवाडीत बालगीते म्हणावी लागत आहेत.
ग्रामपंचायत 14 वित्त आयोगातून झालेली कामे
- 1) विद्युतरोधक यंत्र- 85000
- 2)दलित वस्ती सोलर वॉटर हिटर -286000
- 3)जलशुद्धीकरण यंत्र-280000
- 4)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ई लर्निंग करणे-50000
- 5)धूर फवारणी यंत्र- 60000
आमदार आदर्श ग्राम योजनेतून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विविध रस्ता, व्यायाम शाळा, बस थांबा, आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत आणि जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत हे सर्व मिळून 65 लाखांचा एकत्रित निधी आत्तापर्यंत दिला आहे.