उस्मानाबाद - मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले, अशी टीका भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. अध्यात्मिक आघाडीकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या स्थागितीनंतर तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
ते म्हणाले, की तुमच्यात हिम्मत असेल तर निवडणूक लावा आणि निवडून येऊन दाखवा. साधू-संत तुमचे सरकार पाडून टाकतील, असे म्हणत तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. तुम्हाला खुर्ची टिकवायची असेल म्हणूनच तुम्ही हिंदुत्व विसरलात. मात्र, आता तुमचा चेहरा उघडा पडला आहे. 'मुह मे राम, बगल मे छुरी', असे तुमचे वर्तन असल्याची टीकाही भोसले पत्रकार परिषदेत केली. तर जनतेलाही तुमच्याबद्दल माहिती मिळाली आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिलेली वागणूक महाराष्ट्र बघत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'मंदिराची टाळे तोडायला ही मोगलाई आहे का? या तुम्हाला बघूच'
पाच वर्षे सरकारने टिकवून दाखवा -
'साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आपण करत आहात. ज्या भवानी मातेच्या घोषणा देता आणि निवडणुकीत मातेचा नावावर मते मागता आमचे तुम्हाला आव्हान आहे. आज तुम्ही आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही. त्यामुळे तुम्हाला तुळजाभवानी मातेची ताकद दिसेल. पाच वर्षे तुम्ही तुमचे सरकार चालवून दाखवा. या साधू संतांच्या साक्षीने आणि तुळजापूरच्या तीर्थक्षेत्रात आव्हान देत आहोत. पाच वर्षांत तुमचे सरकार गडगडेल. तुम्ही आमचा तंबू काढून टाकला म्हणून काय झाले? भगवंताचे छत्र आमच्यावर आहे. सहिष्णू मार्गाने सुरू असलेले आंदोलन तुम्हाला पाहावले नाही. शांततेने सुरू असलेले आंदोलन तुम्ही नाकारत असाल तर इथून पुढे असहिष्णू मार्गाने काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी सर्वस्व मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकार जबाबदार असेल', असा इशारा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, सर्व साधुसंतांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांना अटक होईल, असे सांगितले जात आहे. आमचे आंदोलन दपण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात येत आहे. हे सरकार मुघलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळे असल्याची टीका भोसले यांनी केली. तसेच आमचे आंदोलन थांबवण्यासाठी कलम 144 लावण्यात येईल, असेही सांगितले आहे. या कलमामुळे येथील स्थानिक व्यापारी आणि भाविकांना त्रास होइल म्हणून आम्ही हे आंदोलन मागे घेतले आहे. त्याचबरोबर आमचे आंदोलन दडपल्यामुळे आम्ही काळ्या फिती लावून निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.