उस्मानाबाद - भाजप नेता जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे या पुस्तकाचा वाद आता अधिक पेटताना दिसत आहे. उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पुस्तकाचे लेखक गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हेही वाचा... 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजासोबत तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केल्याने, लेखक जय भगवान गोयल यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत, गोयल यांचा पुतळा जाळला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा... 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाविरूद्ध संतापाची लाट; राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची सर कोणालाही येणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज फक्त पुतळा जाळला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मागे घेतले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते.
हेही वाचा... 'मला दोन चाकी चालवायची सवय नाही, पण सध्या तीन चाकी चालवतोय'