उस्मानाबाद - गाढविणीच्या दुधाला सध्या चांगलाच भाव आला आहे. आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या दूधांपैकी गाढवाचे दूध देखील एक आहे. गाढविणीचे दूध हे चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जात आहे. तेही भोंगा लावून. दहा हजार रुपये भाव, चकित झालात ना? हो हे खरं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात दहा मिली दूध घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. उमरगा शहरातील गावठाण परिसरात पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे २० गाढविनी आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.
गाढविणीचे दूध मानले जाते गुणकारी -
गाढविणीचे दूध हे लहान मुले, दमा व न्यूमोनियाासाठी गुणकारी मानले जाते. धोत्रे कुटुंबीय गाढविणीचे दूध सध्या उमरगा शहरात भोंगा लावून विकत आहेत. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून या दुधाची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या दुधाची किंमत एका लिटरमागे दहा हजार एवढी आहे. दहा मिली दुधासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. गाढविणीच्या दुधापासून मिळालेल्या पैश्यातून हे वीस लोकांचे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहे.
![price of donkey's milk](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/thepriceofdonkeysmilkisaroundrs10000perliter_09082021123021_0908f_1628492421_29.jpeg)
दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते -
गाढविणीच्या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ व न्यूमोनिया हे आजार होत नाहीत. शक्यतो लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास ते बरे होण्यासाठी गाढविणीचे दूध गुणकारी आहे. कोरोनाकाळात या दुधाला मोठी मागणी असल्याचे दूध विक्रेत्या लक्ष्मीबाई धोत्रे या सांगतात.
![price of donkey's milk](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/thepriceofdonkeysmilkisaroundrs10000perliter_09082021123021_0908f_1628492421_393.jpeg)
दूध खरेदीसाठी मोठी गर्दी -
उमरगा शहरात गाढविणीच्या या दुधाची चांगलीच चर्चा आहे. गावकरी हजारो रुपये देऊन हे दूध खरेदी करीत आहेत. सकाळी व संध्याकाळी दूध खरेदीसाठी उमरगेकर अक्षरशः तुटून पडताना दिसतात. या दुधाला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी मागणी मिळत आहे.
![price of donkey's milk](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/thepriceofdonkeysmilkisaroundrs10000perliter_09082021123021_0908f_1628492421_170.jpeg)
गाय, म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा गाढविणीचे दूध सकस -
गाढविणीचे दूध हे लहान मुलांसाठी मातेच्या दुधाइतकंच उपयुक्त आहे. पूर्वीपासून गाढविनीचे दूध गुणकारी म्हणून वापरले जाते. या दुधामुळे पोटाचे विकार टाळण्यास मदत होते. व्हिटॅमिन डीची मात्रा अधिक असल्याने रोग प्रतिकारशक्तीही वाढते. या दुधामुळे त्वचा मऊ मुलायम व तजेलदार होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा हे दूध सकस असल्याचे डॉक्टर सांगतात.
वाघिणीच दूध सगळ्याच सकस -
निरोगी आयुष्यासाठी दूध उपयुक्त मानले जाते. वाघिणीच दूध सगळ्यात सर्वांत सकस मानले जाते. मात्र, गाढविणीचे दूध सुध्दा काही कमी नाही हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे महाग असले तरी निरोगी आयुष्यासाठी दररोजच्या आहारात गाढविनीचे दूध घ्यायला काय हरकतय, असेच उमरगेकर म्हणतायेत. त्यामुळे गाढविणीच्या या दुधाला चांगलेच भाव आला आहे.