उस्मानाबाद - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन वगळता केवळ उडीद व मुग या पिकाचा पिकविमा मिळाला आहे. या विम्याची रक्कम अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची असून, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तसेच सोयाबीनचा पिक विमा अद्याप मिळाला नसल्याने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयात गेले होते. मात्र, ते उपस्थित नसल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते कृषी उपसंचालकांच्या कार्यालयात गेले. मात्र, त्यांनी योग्य उत्तरे न दिल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली.
यासंदर्भात कृषी उपसंचालकांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाने पिकविमा कंपनीकडे कसा अहवाल सादर केला आहे? कोणती कागदपत्रे दाखल केली आहेत? याबाबत माहिती विचारली परंतू, उपसंचालक जाधव यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिक विमा मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात असलेल्या सर्व खुर्च्या फोडून टाकल्या. यामुळे कार्यालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. सर्व कर्मचारी धावत उपसंचालकांच्या कक्षाकडे आले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व अन्य कार्यकर्त्यांनी सोयाबीनचा पिकविमा तातडीने मिळावा अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.