उस्मानाबाद - तालुक्यातील टाकळी (बें) या गावातील नरहरी पांडुरंग शिरगिरे यांच्या शेतातील दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे नरहरी पांडुरंग शिरगिरे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतातून महावितरणाच्या तारा गेल्या आहेत. या तारामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दीड एकर ऊसाला आग लागली. उसासोबतच शेतातील स्प्रिंकलरचे तीस पाईप जळून राख झाले आहेत.
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शिरगिरे यांचे 2 लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. शिरगिरे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या शेतात दीड एकर ऊसाची लागवड केली होती. बोरवेलच्या पाण्यावर त्यांनी ऊस जोपासला होता. मात्र, महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यापूर्वी तारा दुरूस्त करून घ्याव्यात, अशी मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामा करावा, अशी मागणी शिरगिरे यांनी केली.
यापूर्वीच्या घटना -
सांगली जिल्ह्यातील भिवर्गी येथे महादेव मल्लाप्पा कुंभार यांचा दोन एकर ऊस वीजवितरण कंपनीच्या शॉर्टसर्किटमुळे आगीत जळून खाक झाला होता. वीजवितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे तोडणीस आलेला ऊस जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच कराडच्या केसे-वारूंजी गावातील शंभर एकर ऊस आगीत जळून खाक झाला होता. या घटनेत शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर पुण्याच्या दौंडमध्ये शेतकरी विकास सुभाष मेमाणे यांच्या शेतातील चार एकर ऊस व ड्रीपचे पाइप जळून खाक झाले होते. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
हेही वाचा - जळगाव मराठा विद्या प्रसारक संस्था वाद : माजीमंत्री गिरीश महाजनांसह स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल