उस्मानाबाद- कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. लहान मोठे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत, तर ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच, आता ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, असे असतानाही बहुतांश विद्यार्थी शिक्षणाच्या गंगाजळीपासून वंचित आहेत.
ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप शाळा कुलूप बंद आहेत, त्यामुळे काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारत पूर्ण शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही शाळांनी या पर्यायाला कोलदांडा देत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला आहे. आर.टी.ई. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात असल्याचे पालक सांगत आहेत.
जिल्ह्यातील १३३ शाळांमधून दरवर्षी साधारण ९०० ते ९५० विद्यार्थ्यांना आर.टी.ई.मधून प्रवेश मिळतो. मात्र, यावर्षी ४०० विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नाही. या प्रकरणी ईटीव्ही भारतने शिक्षण विभागासोबत संपर्क साधला होता. यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले की, आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश घेण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. कोरोना विषाणूमुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत असून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, आर.टी.ई.मधून नवीन प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कळणार नसल्याने नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी ९१६ विद्यार्थ्यांनी १३३ शाळांमध्ये आर.टी.ई. मधून प्रवेश मिळवला होता. मात्र, यातील बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही ऑनलाइन शिक्षण दिले जात नसल्याचे पालक सांगत आहेत. याबाबतीत पालकांनी शाळेसोबत संपर्क केला आहे. मात्र, शाळेकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे पालक सांगत आहे.
त्याचबरोबर, आर.टी.ई व्यतिरिक्त प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाइन शिक्षणाच्या गंगाजळी पासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत पालकांनी आणि मनसेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. कोरोना विषाणूमुळे या वर्षी पालकांना शाळेचे शुल्क भरता आले नाही. त्याचबरोबर, गेल्या वर्षी देखील दुष्काळ असल्याने त्यांना २-३ टप्प्यात संपूर्ण शुल्क भारता आला नाही. त्यामुळेच, आता गतवर्षीचे आणि या वर्षीचे असे दोन्ही शुल्क भरण्यासाठी खाजगी शाळांकडून तगादा लावला जात आहे. सर्व शुल्क भरला तरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येईल, असे शाळेकडून सांगितले जात असल्याचे पालक सांगत आहेत. दरम्यान, शिक्षणाची गंगाजळी सर्वदूर पोहोचवणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र असे असताना कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाबाबतचे चित्र मात्र उलटे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन पद्धतीने यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त