उस्मानाबाद - कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे एकही क्षेत्र शिल्लक नाही की, ज्याला या कोरोना लॉकडाऊनचा फटका बसला नाही. शाळादेखील वेळेच्या आधीच बंद कराव्या लागल्या होत्या. त्या सुरू करण्यास अद्यापही परवानगी मिळालेली नाही. या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा मार्ग पुढे आला. काही ठिकाणी हे ऑनलाइन शिक्षण सुरूही झाले आहे. मात्र, या सर्व गोंधळात गतिमंद असलेली मुले सध्या काय करत असतील? हा देखील एक प्रश्न आहे. ईटीव्ही भारतने या मुलांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
उस्मानाबाद शहरापासून 10 किमी अंतरावर 'स्वआधार' हे गतिमंद मुलींसाठीचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सध्या 105 गतिमंद मुली राहतात. ज्यांचा बुध्यांक आणि आकलन क्षमता कमी असते, अशा मुलांना गतिमंद समजले जाते. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व विद्यार्थी घरी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, स्वआधारमधील सर्व मुली अनाथ आहेत. हे वसतिगृह म्हणजेच त्यांचे घर आहे. त्यामुळेच लॉकडाऊन असूनही ही शाळा बंद झालेली नाही. येथील मुलींना सध्या शालेय अभ्यासक्रम शिकवला जात नाही, तर त्यांचे मनोरंजनात्मक खेळ घेतले जात आहेत. या मुलींची बौद्धिक क्षमता कमी असली तरी त्यांच्या अंगात विविध कला आहेत. लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत या मुलींनी सुंदर गणपती, आणि बियांपासून राख्या तयार केल्या आहेत.
शाळेत मुलींची काळजी घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांसह 40 कर्मचारी काम करत आहेत. इतर वेळी हे सर्व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये एकत्र काम करत असतात. मात्र, सध्या त्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून 15 कर्मचारी सलग पंधरा दिवस येथेच राहून काम करतात आणि दुसरे 15 कर्मचारी पंधरा दिवसानंतर काम करण्यासाठी येतात. कोरोनामुळे शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. बाहेरच्या कुणाला येथे प्रवेश दिला जात नाही व आतूनही कुणी बाहेर जात नाही. त्यामुळे सध्यातरी या मुलींना कोरोना विषाणूचा धोका नाही, अशी माहिती येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दिली.