उस्मानाबाद - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात उस्मानाबादमध्ये 'संविधान बचाव संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. आज (शनिवारी) आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सीएए व एनआरसी (नागरिकत्व नोंदणी रजिस्टर) याला विरोध दर्शवत निवेदनही दिले.
हेही वाचा - 'सीएए'विरोधात महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन
"आम्ही रस्त्यावर उतरून कायदेशीर लढाई लढत आहोत. अनेक राज्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला राज्यांच्या विरोधाला दुर्लक्षीत करून हा कायदा लागू करता येणार नाही. हा महिलांचा लढा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. तसेच हा लढा म्हणजे दुसरा स्वातंत्र्य लढा असून, या अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना संविधानाच्या मार्गाने उलथून टाकायचे आहे." असे पानसरे यांनी सांगितले.
हेही वाचा - 'जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच सीएए कायदा'