उस्मानाबाद - थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्या पदावर रहायचे की नाही याचा निर्णय घेतील. असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, कोश्यारी यांनी आता राजीनामा द्यावा, असेच सुचित केले आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी लिहीलेल्या पत्रातील भाषे बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्याचा आधार घेत पवार यांनी कोश्यारी यांना लक्ष्य केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वादग्रस्त पत्र लिहलं होतं. कोश्यारी यांच्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात उत्तर दिले होते. त्यानंतर या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही पत्राची भाषा योग्य नसल्याचे वक्तव्य केले होते.
काय आहे प्रकरण -
राज्यातील मंदिरे बंद असण्याच्या मुद्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत टीका केली होती. तुम्हीही धर्मनिरपेक्ष झालात का अशी विचारणा करत, एकीकडे सरकार बार, रेस्टारंट खुले करत आहे. पण देवीदेवतांची मंदिरे अजून ही बंद आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. हे सार्वजनिकरित्या मान्य करता. अयोध्येला आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात कोश्यारी यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती.
कोश्यारी यांच्या पत्रावर उध्दव ठाकरे यांनी कडक शब्दात उत्तर दिलं होतं. त्यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसून स्वागत करत नाही, असे म्हटलं होते. दरम्यान, हा मुद्दा राज्यभरासह देशात गाजला. अनेकांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर आपेक्ष घेतला. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कोश्यारी चुकले असल्याचे मान्य केलं. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या शब्दांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करु शकले असते, असे अमित शाह यांनी सांगितलं.
आता पवार काय म्हणाले -
आता या मुद्यावरून शरद पवार यांनी कोश्यारींना धारेवर धरलं आहे. त्यांनी कोश्यारी यांच्याकडे थोडा जरी स्वाभिमान असेल तर ते राज्यपालपदाचा राजीनामा देतील, असे म्हटलं आहे. राज्यपालांची ती भाषा राज्यपालपदाची प्रतिष्ठा वाढवणारी नाही, मी अनेक राज्यपाल पाहिले पण असे वक्तव्य कोणी केलं नाही. कोश्यारींनी पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, राज्यपालांनी प्रतिष्ठा जपली नाही मग अशी स्थिती परिस्थिती होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांना स्वाभिमान असेल तर त्यांनी पदावर रहावे की नाही हे ठरवावे, असे पवार म्हणाले.