उस्मानाबाद - जिल्ह्यात एकाच कुटुंबात राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचा जन्म झाला आहे. पण हे दोघेही त्या पदाचे नाही तर फक्त नावाचे मालक आहेत. आधुनिक युगात बाळांचे नामकरण आगळ्या-वेगळ्या स्वरुपाची होताना आपण पाहतो. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी मुलाचे "पंतप्रधान" ( pantpradhan ) असे नामकरण केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव 'राष्ट्रपती' ( rashtrapati ) असे आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती व पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत.
सिनेमा, क्रीडा क्षेत्रानंतर आता घटनात्मक पद असलेल्या नावावर भर -
ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन नाव ठेवले जाते. अलीकडच्या काळात राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह आधुनिक नावे बाळाला देण्यात येतात. परंतु, आता घटनात्मक दर्जा असलेल्या पदांची नावे देण्याची नवी पध्दत रुढ होऊ पाहत आहे. याची प्रचिती दत्ता व कविता चौधरी याच्या कुटुंबातील नामकरण सोहळ्याने समोर आली आहे. जेव्हा त्याच्या दुसऱ्या मुलाची नामकरणाची वेळ आली. तेव्हा चौधरी यांनी दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवण्याचा निर्णय घेतला.
चौधरी कुटुंबात राष्ट्रपती व पंतप्रधान एका छताखाली एकत्र वाढणार -
मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतून पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेणार आहेत. चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधार कार्डही यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवले आहे. राजकीय रस्सीखेच होत असली तरी चौधरी कुटुंबात मात्र राष्ट्रपती व पंतप्रधान एका छताखाली एकत्र वाढणार आहेत.
केला आहे 'असा' प्रण -
मुलाची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवल्याने भविष्यात त्या मुलांना राष्ट्रपती व पंतप्रधान करेल असा प्रण ही दत्ता चौधरी यांनी केला आहे. घटनात्मक पदाची नावे ठेवण्याचा हा पायंडा आगामी काळात कायदेशीर पेच निर्माण करणाराही ठरू शकतो. मात्र काहीही असो पण पंत्रप्रधान आणि राष्ट्रपती या नावांमुळे जिल्ह्यातचं नव्हे तर राज्यात याची चर्चा सुरु आहे. आता नावाप्रमाणे दोघे राष्ट्रपती आणि पंतप्रधान होतात की, इतर क्षेत्रात नावलौकिक करतात हे भविष्यातच समोर येईल.
हेही पाहा - Taj Mahal : बुरहानपूरच्या 'शाहजहा'ने पत्नीला भेट दिला 'ताज महल'