उस्मानाबाद - पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, पारधी समाज, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषण, आंदोलन करण्यात केले.
देशासह राज्यभरात काश्मीरसंबंधी असलेल्या 370 कलम बाबतीतच चर्चा आणि उत्साह पाहायला मिळत होता. मात्र, उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या आंदोलनाची चर्चा पाहायला मिळत आहे. यातील पहिले आंदोलन पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. आमच्यावरती गेली कित्येक वर्ष अन्याय होत आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी आम्ही निवेदन दिले. मात्र, याबाबतीत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी सहकुटुंब सहपरिवार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत, असे म्हटले आहे.
तर दुसरे आंदोलने पारधी कुटुंबाचे होते. या आंदोलनासाठी सखुबाई पवार, शिवाजी पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. कळंब येथील तानाजी कापसे, रमेश बारकुले या गावातील लोकांनी मारहाण करून जेसीबीच्या साहाय्याने पारधी कुटुंबाचे घर पाडल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, याबाबतीत पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत आम्हाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी हे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे.
तर तिसरे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाने केले आहे. यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँक परंडा येथील प्रलंबित असलेले कर्ज प्रस्ताव लवकरात लवकर वाटप करण्यात यावे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या डोंजा येथील घरकुल योजना सुरू करून न्याय द्यावा. त्याचबरोबर परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी येथील गायरान जमिनीत कित्येक वर्षापासून असलेली झोपडपट्टी अधिकृत करण्याचे आदेश देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या रिमझिम पावसातच धरणे आंदोलन व आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू होते.