उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवसाय ठप्प करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दारू विक्रीसदेखील बंदी घालण्यात आली आहे, असे असतानाही दारूची अवैध विक्री वाढलेली असल्याचे पाहायला मिळते आहे. अशाच प्रकारे अवैधपणे सुरू असलेल्या दारूविक्रीवर उस्मानाबाद पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल अडीच लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.
उस्मानाबाद शहर पोलिसांनी प्रभा बार या हॉटेलवर छापा टाकत तब्बल अडीच लाख रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दारू विक्री करणाऱ्या एकास अटक केली असून एक जण फरार झाला आहे.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या बारचा परवाना रद्द करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.