उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात राहणारा कबीर शेख कामासाठी कंबोडियात गेला होता. मात्र, तेथे त्याच्यासोबत असे काही घडले जे ऐकून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. कबीरला कंबोडियात सुमारे 5 हजार डॉलर एवढा पगार महिन्याला मिळेल, अशा प्रकारच्या जॉबची ऑफर देण्यात आली. एवढ्या चांगल्या जॉबची ऑफर आल्यानंतर नेमका जॉब कसा आहे हे पाहण्यासाठी कबीर पुण्याहून बेंगलूरू ते बॅकांक आणि मग बँकाकहून कंबोडिया असा प्रवास करीत या कंपनीत पोहोचला. मात्र, कबीर जेव्हा कंपनीच्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला त्याठिकाणची परिस्थिती पाहून पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होत होती. त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात रॉडचा फटका मारण्यात आला होता. तेव्हा तो कर्मचारी तडफडत असल्याचे कबीरने डोळ्यांनी पहिले. दरम्यान, कबीर ज्या कंपनीत पोहोचला त्या कंपनीची भिंत 15 फूट उंच आणि त्याच्यावर तारेचे कुंपण होते. त्याचबरोबर, गेटवरती 30 सुरक्षा रक्षक होते. त्यामुळे परत तिथून निघणे हे शक्य नव्हते.
फसल्याची झाली जाणीव : ही घटना पाहून कबीरला आपल्याला फसवण्यात आल्याची जाणीव झाली. त्यानंतर कबीरला त्या ठिकाणच्या लोकांनी ताब्यात घेतले. त्याला भारतातीलचं लोकांना फसवण्यास सांगितले. ते म्हणजे शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम, डिवोर्सी डॉट कॉम या लग्नासाठी जोड्या जमवणाऱ्या साईटवर खोटी प्रोफाईल तयार करायची. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करून घ्यायचे. प्रोफाईलवर जोडायचे. यानंतर भारतीयांसोबत चॅटींग सुरू करायची. यामध्ये ज्याची वर्षाची कमाई २० ते २५ लाख रुपये आहे अशा लोकांना फसवून त्यांना पैसे गुंतवण्यास सांगायचे. ते पैसे लुटायचे अशा पद्धतीचे काम कबीर आणि त्याच्यासोबत असणार्या ७ भारतीय तरुणांना करण्यास सांगितले. जर हे काम व्यवस्थितपणे केले नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात येत होती, अशी धक्कादायक माहिती कबीरने बोलताना दिली. कंपनीकडे असे सॉफ्टवेअर आहेत, जे एकाचवेळी 20 ते 30 व्हॉट्सअप खात्यांमध्ये लॉगइन करते. चिनी भाषेतील संदेश कोणत्याही भाषेत अनुवादित होतो. असे देखील काही सॉफ्टवेअर असल्याचे कबीरने सांगितले आहे.
अशी झाली सुटका : कबीर आणि त्याच्यासोबत असलेल्या भारतीय तरुणांना कबीरने सांगितले की काहीही करून आपल्याला उद्या सकाळी येथून निघायचे आहे. कबीरने पूर्ण तयारी करण्यास सुरुवात केली. कबीरने त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना फोन केला. संपूर्ण हकीकत सांगितली. कंबोडियन पोलीस कबीर आणि इतर लोकांच्या मदतीला धावून आले. यावेळी पोलिसांना आपल्या कंपनीतून फोन गेल्याची माहिती त्या ठिकाणच्या लोकांना समजली. त्यांनी सर्वांना पोलिसांना माहिती कोणी दिली याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कबीराच्या डोक्यावर बंदूक देखील ठेवण्यात आली होती. मात्र, पोलीस येण्याची हे सर्व अडकलेले भारतीय तरूण वाट पाहत होते. त्यांना काही गोष्टीत अडकवून वेळ मारून नेत होते. अखेर कंपनीत कंबोडियन पोलीस पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी कबीर आणि इतर भारतीयांची सुटका केली. अजूनही 15 भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम इथे करुन घेतले जात आहे. अशी माहिती कबीरने बोलताना दिली आहे.