उस्मानाबाद - लोकसभेचे वातावरण आता चांगलेच तापत आहे. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरील सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
कार्टून काढून सुरू झालेले हे युद्ध आता व्हिडिओ आणि एकमेकांची केलेल्या पराक्रमाची पुस्तकांवर आले आहे. सुरुवातीला कार्टूनची जागा भावनिक पत्रांनी आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांचे वस्त्रहरण सुरू झाले आहे. गुरुवारी (४ एप्रिल) राष्ट्रवादीकडून ओमराजेंचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. यामध्ये ओमराजे त्यांच्या पक्षातील विद्यमान खासदार आणि माजी आमदारांना शिव्या देत आहेत. या व्हिडिओचं डबींग केल्याचा दावा ओमराजे यांनी फेसबुकवर पोस्टवरून केला. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार केली.
राष्ट्रवादीने व्हायरल केलेल्या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दुसरा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती लोकसभेचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी मारहाण केल्याचा दावा करत आहे. या दोन्ही व्हिडिओमुळे जिल्ह्यातील राजकारण सोशल मीडियावरील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, निवडणूक विभाग या घटनांकडे किती गांभीर्याने घेते याकडे लक्ष लागले आहे.