उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आसू गावाच्या एका ३८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याचा ५ जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तो, मला कोरोनाची लागण झाली असून मी उपचार घेत आहे. पण येथील डॉक्टर व्यवस्थित उपचार करत नाहीत. रात्री ऑक्सिजन बंद करतात, असा आरोप करत ही बाब जिल्हाधिकारी साहेबांना सांगा, असे आवाहन करताना पाहायला मिळाला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ माजली. आता या प्रकरणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहेत.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, 'त्या तरुण रुग्णाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची शक्यता असून याबाबत मी स्वतः खात्री केली आहे. त्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर हजर असतात. त्यामुळे त्या तरुणाने व्हिडिओत जे सांगितले आहे. ते खोट आहे.'
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी स्पष्टीकरण देत रुग्णालयाला क्लीन चीट दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी घेतलेल्या स्वॅब नमुन्यातील काही अहवाल व रविवारी घेतलेल्या नमुन्यातील स्वॅब हे प्रलंबित होते. ते सोमवारी दोन टप्प्यात प्राप्त झाले त्यानुसार जिल्ह्यात एकूण 18 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 286 रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 191 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 81 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा 5.1 टक्के आहे, तर उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - बघा, कोरोनाग्रस्त तरुणाचा अखेरच्या क्षणांचा व्हिडिओ, रुग्णांची हेळसांड चव्हाट्यावर
हेही वाचा - सावधान... फेसबुक अकाऊंट हॅक करून होतेय पैशांची मागणी!