उस्मानाबाद - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उस्मानाबाद विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हा मतदार संघावर नेहमीच राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य व माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. गेली ३६ वर्ष त्यांच्या घराण्याची सत्ता याठिकाणी असून सध्या त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे तेथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, सध्या ते भाजपच्या वाटेवर असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील हे या मतदारसंघातून सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये डॉ. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली व उस्मानाबाद विधानसभेसाठी त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी १६,९७४ मतांनी पराभव केला. मात्र, त्याचा वचपा आमदार राणा यांनी २०१४ च्या निवडणुकीत काढत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा १०,८०६ मतांनी पराभव केला. २००४ पासून डॉ. पाटील व निंबाळकर या घराण्यात संघर्ष सुरू आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यामुळे याचा सर्वच फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील यांना झाला. पाटील यांना ८८,४६९ मते पडली तर शिवसेनेचे राजेनिंबाळकर यांना ७७,६६३ अशी मते पडली. भाजपकडून संजय पाटील दुधगावकर व काँग्रेसकडून विश्वास शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.
पाटील आणि राजेनिंबाळकर कुटुंबातील संघर्ष हा सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही हाच संघर्ष असेलच कारण ओमप्रकाश राजेनिंबाळकर आता खासदार आहेत. त्यामुळे ते पूर्ण ताकतीने पाटील यांना विधानसभेत हरवण्यासाठीच प्रयत्न करणार, असे सध्या तरी दिसून येत आहे.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ हा युतीकडून शिवसेनेकडे तर आघाडीकडून राष्ट्रवादीच्या वाट्याला येत आहे. राणाजगजितसिंह पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा जोर धरत आहेत, त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी भरपूर आहे. तर वंचित बहुजन आघाडीने सर्वच पक्षांसमोर चांगले आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या मतदार संघात कोण बाजी मारते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.