उस्मानाबाद - शहरातील मारवाडा गल्ली येथील वृद्ध महिलेची 3 आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींनी महिलेचे 1 लाख 89 हजार रूपयांचे दागिने लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी, की कुसुम ग्यानराज भोसले या बाजारातून घरी परतत असताना त्यांना 3 अनोळखी पुरुषांनी सावरकर चौक येथे गाठले. त्यानंतर या तिघांनी भोसले यांना आम्ही पोलीस आहोत. सध्या सगळीकडेच चोऱ्या होत आहेत, तुम्ही सावध व्हा, तुमच्या जवळील सोने आमच्या समोर पिशवीत काढुन ठेवा, असे सांगितले.
भोसले यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवत अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवत असताना चोरट्यांनी हातचलाखीने त्यांच्या पिशवीतील 6 तोळ्याच्या पाटल्या, 1 तोळ्याची अंगठी, असे एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचे दागिने काढुन घेतले. हा सर्व प्रकार कुसुम भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर भोसले यांनी अज्ञात लोकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.